श्री क्षेत्र घोसरवाड
 
Ghosarwad Abhishek Ghosarwad Palakhi Aanna Ghosarwadkar Appa Ghosarwadkar
   
  अवतार संकल्प

घोसरवाड' नावाचे एक छोटेखानी खेडे कोल्हापूर जिल्हयातील शिरोळ तालुक्यात आहे. तिथे 'सिदोबा-सिध्देश्वर' नावाचे ग्रामदैवत आहे. या ग्रामदैवतावर सर्व जाती जमातींची अलोट श्रध्दा आहे. ह्या श्रध्देच्या अनामिक सूत्रांने संपूर्ण गाव बांधला गेला आहे. त्याचे एक भावनात्मक ऐक्य अतूटपणे पहायला मिळते. हे सिध्देश्वर नाथपंथातील आठवे नाथ, रेवणनाथ होत.
नाथसंप्रदायाचे आद्यगुरू आदिनाथशंकर ते देखील या पंथसाधनेची अजून वाटचाल करत आहेत. असे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे.

'इथे मार्गीचा कापडी । महेश अजुनी ।।'

श्री विष्णूचा अवतार असलेल्या मच्छिंद्रनाथांना आदिनाथांनी दीक्षा दिली. मत्स्येद्रनाथांचा कर्तृत्ववान पुर्नस्थापना करण्याचे ठरवले. श्रीकृष्णांनी 'चमसनारायणास' सांगितले की मी 'ज्ञानेश्वर' होऊन परमेश्वराच्या दाराची बंद झालेली कवाडे सताड उघडी करेन. तुम्ही 'रेवण' होऊन 'रेवातीरी अवतीर्ण व्हावे आणि आपले अंगीकृत कार्य करावे. पुढे या युगधर्माला अनुकूल असे अवतार घेत त्यांनी धर्मोध्दाराचे कार्य केले. 'आल्लमप्रभूनी' पण कर्नाटकात अशी जागृती आणण्यासाठी आपला देह झिजवला.
श्री हालसिध्दनाथ संचार करता करता एका शुभवेळी घोसरवाडी नदीतीरी आले

साध्वी सावित्रीबाईंना नाथ दीक्षा :

गावात वार्ता कळलीकी, कोणी एक तेजःपुंज बैरागी नदीवर आला आहे. तो झोळीतून मुलांना हवे ते पदार्थ काढून देतो, झाले ! हां हां म्हणता ही वार्ता गावभर झाली. महाराजांच्याकडे लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या. त्यातून अनेकांच्या समस्यांना उत्तरे मिळाली. अनेकांच्या आधि-व्याधी दूर झाल्या. बहुत किर्ती झाली.

त्यावेळी भिकाजीराव शिंदे, घोसरवाडकर या सरदारांचा तेथे अंमल होता. सध्याचे 'सत्यजित अजितसिंह शिंदे' सरकार हे त्यांच्यापासून नवव्या पिढीतले आहेत. श्री सत्यजितांचे वडील अजितसिंह, त्यांचे वडिल सिद्रामराव त्यांचे वडिल परशुराम अशी वंशावळ आहे
मुळ भिकाजीराव शिंदे त्यांच्या धर्मपत्नी पुण्यश्लोक 'सावित्रीदेवी' ह्या अतिशय 'श्रध्दावाना आणि साध्वी गृहिणी होत्या. त्यांच्या कानी ही वार्ता गेली. त्या नाथांच्या दर्शनासाठी भावव्याकूळ झाल्या. आपल्या पतीच्या अनुज्ञेने त्यांनी नदीवर जाऊन 'श्री हालसिध्दनाथाचे दर्शन घेतले. त्या दोघ गांची दृष्टादृष्ट झाली आणि सावित्रीदेवींना त्यांच्या अंगातून वीज सळसळल्याची अनुभूती आली अनेक जन्मांतरीचा 'गुरू' भेटल्याचा आनंद त्यांना झाला. नरेंद्रांची व रामकृष्ण परमहंसाची भेट झाल्यावर जसे गुरू शिष्य एकमेकास पूर्वीची ओळख असल्यासारखे भेटले त्याचप्रमाणे 'श्री हालसिध्दनाथ व साध्वी 'सावित्रीदेवींचे झाले. 'धवकाले जगदाकारांचा अनुभव साध्वी सावित्रीबाई घरी परतल्या. त्यांना पहिल्या भेटीतच "दृक दीक्षा" मिळाली होती.

सावित्रीदेवींना अशी "दृक दीक्षा" मिळाल्यानंतर त्यांची भावस्थिती पार पाडत वरचेवर नाथांच्या दर्शनाला जाऊ लागल्या आणि एके दिवशी त्यांना वाटू लागले. त्यांना आपल्या वाड्यातच राहायची विनंती त्यांना करू या
आपल्या पतीची 'अनुज्ञा घेऊन नाथांना मोठ्या आग्रहाने गावात येण्याची विनंती केली सावित्रीदेवींच्या निर्व्याज, निरागस भक्तीपोटी त्यांनी त्यांची विनंती मान्य केली. आणि ते घोसरवाडकरांच्या वाड्यात कालक्रमणा होत राहिली आणि भक्तीसागराला उधाण येऊ लागले. पण प्रारब्ध व सहसा बदल होत नसतो. जन्माला येताना जी पापपुण्याची 'शिदोरी' बरोबर आणतो त्यापलिकडे माणसाला अधिक काही लाभत नाही. सावित्रीदेवींच्या ारी सुखाच्या काही प्राप्त होते. ऐश्वर्य, शेतीवाडी, धनधान्य यांची रेलचेल होती, पण वसंत सरला तरी 'कल्पतरूला फूल लागलेले नव्हते आणि वात्सल्य हा स्त्रीचा स्थायीभाव आहे. सावित्रीदेवी मनांत थोड्याशा खडू होत्या. 'त्रिकालज्ञानी' नाथांची ही गोष्ट ओळखली आणि सावित्रीबाईंना ज्या वेळी मुलाची तीव्र इच्छा होई. त्यावेळी नाथ महाराज लहान मुलांचे रूप घेऊन अंगाखाद्यावर खेळत असत. 'कस्तुरीचा अमोद' जसा कितीही लपवला तरी लपला जात नाही तशी वार्ताही लपली नाही. सर्वांना कळाली.

अनेक जण कोणत्या ना कोणत्या दृष्टीने, शंकित दृष्टीने याकडे बघूल लागले. पराचा कावळा झाला आणि सावित्रीदेवीच्या पतीच्या कानावर ही वार्ता पोहोचली. त्यांचे कान भरले, मजल इथपर्यंत गेली की हा तथाकथित साधू साधू नसून कपटी जादूगार आहे. अनेक रूपं घेऊन हा तुमच्या पोरीला पळवून नेईल अशी कानभरणी केली. "विनाशकाले विपरीत बुध्दी" या न्यायाने भिकाजीरावांच्या रागाचा पारा चढला आणि आणि तुरूंगात टाका' असा हुकूम बजावला. फर्मान सुटले. नाथांना पकडून तुरूंगात डांबण्यात आले आणि काय आश्चर्य! एक मुर्ती तुरूंगात दिसू लागली. आणि एक सावित्री देवींच्या जवळ दिसली. इतक्यात श्री नाथ दरवाजाच्या बाहेर निघून गेल्याचे दिसले. भांबावून गेलेल्या सेवकांना 'नाथांचा पाठलाग करून आणण्यास सांगितले. त्यांना पकडणे म्हणजे प्रकाश पकडण्यासारखे आहे हे बिचाऱ्या जीवांना काय माहीत? घोडेस्वार सुटले, पाठलाग सुरू झाला. श्रीनाथ घोडेस्वार होऊन पुढे धावताहेत व त्यामागून घोड्यावर बसलेले सैनिक पाठलाग करताना वाटेत काही घोडी पडली, मेली, त्यावर मागून येणारे सैनिक धडकले. काही पायउतार होऊन पडले ते मुक्त झाले. हा पाठलाग सध्याचे क्षेत्र 'आप्पाचेवाडी' असलेल्या फडापर्यंत झाला. 'श्री नाथ महाराज' या फडात गुप्त झाले. असे वर्णन मुखातून चालत आले आहे.

इकडे सावित्रीदेवींना फार वाईट वाटले, 'आपल्या पतीने अज्ञानाने, दुसऱ्याच्या सांगण्यावरून हे कृत्य केले' त्यांनी परोपरीने प्रार्थना केली, 'महाराज आपण क्षमाशील आहात, सर्व आपण त्याचा राग मानू नये,' नाथांचे पुनर्दर्शन झाल्याशिवाय अन्नग्रहण करणार नाही. त्यांनी कडूनिंबांच्या रसावर सात दिवस गुजराण केली, आठवे दिवशी महाराज सावित्रीच्या पुढे येऊन उभे ठाकले. सावित्रीदेवींनी हृदयाची पायघडी घालून नाथांचे स्वागत केले, आणि आपल्या पतीला 'क्षमा' करण्याची विनंती केली, 'अज्ञानी माणसाला आपणाशिवाय कोण क्षमा करणार आपण क्षमा केल्याशिवाय मी आपले पाय सोडणार नाही असा त्यांनी भाविव्याकुलतेने निर्धार व्यक्त केला. तेव्हा प्रसन्न झालेल्या नाथांनी सांगितले. 'सात पिढ्यांपर्यंत डाव्या पायांनी माती सारली तरी मी गोड मानून घेईन पण मला आता इथे राहता येणार नाही.' असे म्हणून गुप्त होऊ लागले. त्यावेळी सावित्रीदेवींनी त्यांच्या जटा धरल्या, त्यातील काही बटा त्यांच्या हाताला लागल्या. त्या बटा त्यांनी चांदीत मढवून ठेवल्या होत्या.

सध्या त्या मात्र उपलब्ध नाहीत. त्यावेळी सावित्रीदेवींनी श्रीनाथांची एक पंचधातूंची मुर्ती घडवून घेतली व तिची स्थापना घोसरवाडकरांच्या वाड्याबाहेर नैऋत्य दिशेला जे देऊळ आहे तिथे केली. त्याला आता 250 वर्षे पूर्ण झाली. या अवधीत त्या मुर्तीची झीज झाली. म्हणून त्याची पुर्नस्थापना करणेचा विचार पंचाच्या मनी आला, त्यांनी देवांना कौल लावून आदेश घेतला आणि नवीन मुर्ती करण्यासाठी ती मूर्तीकारांकडे सुपूर्त केली. मुर्तीकार मिळणे, त्यासाठी लागणारे सोने, चांदी इ. पंचधातू मिळणे या गोष्टी एका अनामिक सुत्राने घडत असल्याचा प्रत्यय आज सर्वांना येत आहे. प्रस्तुत प्रसंगात या लेखाची लेखिका डॉ. सौ. अनुराधादा. कुलकर्णी सांगली यांना एका रात्री नूतन मूर्तीस्थापनेच्या या दिव्य प्रसंगाची स्मरणिका काढण्यासंबंधी आदेश झाला त्यांना स्फूर्ती आली आणि त्यानूसार त्याची पूर्तता होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू देखील झाली. यापरता दुसरा प्रत्यकारी अनुभव तो कोणता ?
   
  नाद बिंदू :
नाद बिंदू :
श्रक्ती हे सर्व ज्ञानाचे, कर्माचे व योगाचे मुळ असून नाथपंथाने शुध्दाचरणपूर्वक नामभक्तीवर भर देऊन नादानुसंधान शिकविले. ओंकार हे नाद बिंदू कला यांचे एकाकार रूप असून 'नादानुसंधान समाधिभाजां' या श्लोकातून नादालाच परमतत्व, परमज्ञान, परम स्वभाव मानलेले असून या नादतत्वासाठीच शिंगी, ढोल, नगारा, घंटा, शंख इ. वाजविले जातात. या अनाहत नादाने 15 दिवसात चित्ताची एकाग्रता घडून ब्रम्हरंध्राचे कपाट उघडते. मन नादाबरोबरच लय पावते. 'मन गेलेसे विलया । ब्रम्हानंदा माझारी ।' असे ज्ञानेश्वर सांगतात.
हा नाद आणि बिंदू यांचा घनिष्ट संबंध असून सहस्रारचक व मुलाधार चक या दोन बिंदूना जोडणारे नाद हेच सुत्र आहे. नाथपथांने ओंकार नाद हाच वेद मानला असून नाम आणि नाद एकच आहेत. हे भक्तीचे तत्व नाथपंथाने सिध्द केले. म्हणनू गुरूनामाचे मंत्र गाणारी पंचपदी देवाला फार प्रिय आहे. या नामाचा छंद घेऊन श्रीनाथ कृपेने आपणा सर्वांनाच परमसुख प्राप्त व्हावे अशी श्रीनाथ चरणी प्रार्थना. दि. 26 व 27 ऑगस्ट 1997 रोजी होणाऱ्या श्री हालसिध्दनाथांच्या नूतन मूर्तिप्राण प्रतिष्ठेत हीच भक्ती संस्थापनेची, धर्म संस्थापनेची प्रेरणा असून देवाच्या अवताराचे रहस्य यातच आहे. त्या अनुहत नादाचा त्या नामस्मरण भक्तीचा आनंद श्रीनाथकृपेने सर्वांना प्राप्त व्हावा ही श्री नाथचरणी प्रार्थना करून नाथपंतांच्या स्वरूपाचे विवेचन पूर्ण करीत आहे.

"।। श्री हालसिध्दनाथ महाराज की जय !
राजधिराज श्री सद्‌गुरूनाथ महाराज की जय ।।"

एकात्म अव्दैताचे सुख :
गेली 250 वर्षे लोकांची सेवा देवतेवरील श्रध्दा देवभक्ती कमी झालेली नाही. संपूर्ण गावांचा एक परोपकारी नियंता असावा त्याप्रमाणे या दैवतांचे अद्याप स्थान आहे. या देवतेला कौल लावूनच आजही महत्वाचे निर्णय घेतले जातात. श्री. शिंदे घोसरवाडकर यांचा अद्याप पूर्वापार चालत आलेला 'मान' अबाधितपणे चालू आहे. त्यांनी 'भंडारा' उधळल्याशिवाय 'पालखी' उठत नाही, या देवाची पालखी वर्षातून दोनवेळा गाव प्रदक्षिणा करणेस बाहेर पडते. एक दसऱ्यादिवशी व दुसरी रथसप्तमीच्या दिवशी वर्षाला रथसप्तमी, अष्टमी व नवमी अशी देवाची यात्रा असते. यावेळी देवाची काढतात व नदीला आंघोळीला म्हणून घेऊन जातात. यावेळी धनगरांनी ढोलांची सेवा करायची असते.

पालखी वाजत गाजत नदीवर जाते. नदीवर मुर्तीला स्नान घालून तिथे काही काळ पालखी थांबते. जाताना पालखीचा मार्ग ठरलेला आहे. ए खाद्या नवशिख्या माणसाने अज्ञानाने अन्य मार्गाने ती नेण्याचा प्रयत्न केल्यास ती पालखी खेचून त्याला योग्य मार्गावर घेऊन जाते. हा अनुभव आजही प्रत्ययास येतो. नदीवर गेलेल्या पालखीच्या दर्शनासाठी सारा गाव वड्या-भाकरी घेऊन नदीवर जातो व तिथे दह्याचा वड्या भाकरीच्या (काला) सहभोजनाचा कार्यक्रम होतो. यामुळे परस्परांतील असलेला दुरावा नाहीसा होण्यास त्याची मदत होते. जीवांचे 'मैत्र' वाढते आणि भावनात्मक ऐक्याचे स्वर्गसुख अनुभवण्यास मिळते. हेच अव्दैताचे सुख होय,

जीव शिवकळा - शिवशक्ती संचार
यावेळी काही लोकांना संचार अवस्था निर्माण होते. या संचार अवस्थेस शिवकळा म्हणतात. ही संचार अवस्था शिव उपासकामध्ये शैव पंथामध्ये विशेषतः दिसून येते.
ही शिवकळा म्हणजे नेमके काय हा एक संशोधनाचा विषय आहे. आपल्या तत्त्वज्ञानाप्रमाणे प्रकृती सर्व काही करत असते. 'पुरुष' तटस्थ असतो. शिवातील 'ई' म्हणजे शक्ती, शक्ती वाचून शिव म्हणजे शव होय.
गुरूकृपेने प्राप्त झालेली 'शक्ती' त्या साधकाच्या अंगात संचरण करते व मुळात शरीरात करत असलेल्या 'कुंडलिनी'ला स्पर्श करते. ही 'कुंडलिनी मूलाधार चकात सुप्त अवस्थेत असते. तिला जागृत करून ती उर्ध्वमुख करून ती शक्ती परत जिथून आली तिथे ही उर्ध्वमुख झालेली कुंडलिनी अचाट कार्य करते. तुकाराम महाराजांनी 'उर्ध्वमुखे केला शब्दाचा नाद' असे सार्थ उद्‌गार काढला आहे. अशी उर्ध्वमुख झालेली कुंडली साधकाला शक्ती प्राप्त करून देते. या प्राप्त झालेल्या शक्तीच्या योगे हा साधक तलवारीचा व गुंडाचा खेळ करते.

तलवार

देवाच्या पालखीत एक धारदार तलवार म्यान करून ठेवलेली असते. मुर्तीबरोबर तिचे यथासांग पुजनही होते. ती तलवार म्यानातून काढून संचार झालेल्या साधकाच्या हातात देतात व तो साधक ढोलाच्या नादावर नाचत ती तलवार पोटावर सपासप मारतो आणि त्यावेळी देवाचा पुजारी पोटावर भंडारा फेकतात. त्यायोगे पोटावर पडणाऱ्या तलवारीच्या वाराची इजा होत नाही. हे अद्भूत स्वरूप आजही पहावयास मिळते.

गुंड
म्हणजे सहा शिसाचे जड गोळे लोखंडी साखळीनी एकत्र केलेले असतात. त्याला एक लाकडी मुठ असते. गुंड तयार करण्याची प्रकिया देखील ठराविक आहे. हे गुंड संचार केलेले साधक उड्या मारत इतक्या जोरात पाठीवर मारून घेतात की कित्येक वेळा त्याच्या कड्या तुटतात. हा ढोलाच्या तालावर चालत असलेला खेळ नाथांच्या दरबारातील अपूर्व अद्भूत सोहळा अन्यत्र पहावयास मिळत नाही.
'नवमी' दिवशी 'पालखी' धनगरांच्या वाड्यातून उठून वेशीत गावाकडे तोंड करून वेळी बसते. तिथेपरत अनेक साधकांचा तलवार, गुंडाचा खेळ होतो. सर्व जण एका बेधूंद आनंदाच्या डोही डूंबत असतात. तिथे संसारातील संकट वेदनांना विस्मृती लाभत असते. मायेचे पटल क्षणभर दूर होऊन मुळचा आनंदरूप असलेला जीव आत्मस्वरूपाचा आनंद मिळवत असतो. पालखी गावात यायला निघते. त्याचा देखील मार्ग ठरलेला आहे. त्या दिशेने ती जात असते. वाटेत येणाऱ्या प्रत्येक घरासमोर पाणी घालणे, आरती करणे, प्रसाद देणे इत्यादी गोष्टी झाल्यावर पालखी पुढे जाते. पालखीची पुढची दांडी धरण्याचा मान बारावाडे यांचा असून मागील दांडी धरणारे आरबोळे यांचा मान आहे. हा मान ते परंपरेने जीवापासून जपत आहेत. देवाची दांडी धरण्याचा मान एका विशिष्ट घराण्याचा आहे. तेव्हा वाजत गाजत ताल धरणाऱ्या भालदार चोपदारांच्यासह लोकांच्या श्रध्देच्या पायघड्यावर हालसिध्द चरण पहावे आणि डोळ्यांचे पारणे फिटावे असा हा नयनरम्य सोहाळा असतो, तो भाग्यवानांना पहायला मिळतो.
जाती जमातींचे ऐक्य :
विशेष म्हणजे 'भक्तीच्या उदात्ततेतून' इथे सर्व जाती जमातींचे ऐक्य पहायवयास मिळते. मराठा, धनगर, जैन, माळी, कोळी लिंगायत सारे भक्तीच्या भावनेने एकत्र आलेले असतात. वडीलधाऱ्याबद्दल आदर, लहानांबद्दल वात्सल्य यांचा सुंदर मिलाफ येथे घडतो. कां होईना लोकांचे मत्सरादिविकार लोप पावतात आणि अष्टसात्विक भाव जागृत करणारी भावस्थिती निर्माण होते. वास्तविक जैनधर्माप्रमाणे मूर्तीपुजा निषिध्द आहे, धूप दीपादी मूर्तीची पूजा करणे मिथ्या देवाला भजण्यासारखे आहे. पण इथै जैन हा तिथे जैन राहत नाही, ब्राम्हण हा ब्राम्हण रहात नाही. एका भक्ताच्या श्रेष्ठ पातळीवर तो आरूढ होतो व बाकीचे सर्व उपचार तो विसरून जातो.

दहावे नाथ :
प.पू. गोविंदपंत घोसरवाडकर हे एक अवतारी व्यक्तिमत्व होते. यांच्या वडिलांचे नांव चिमणाजीपंत. हे मूळ घराणे 'कोकटनूरचे' कुलकर्णी. मुळचे आडनांव 'खासनीस' या कोकटनूरहून दुष्काळग्रस्त होऊन बाहेर पडले. ते घोसरवाड ग्रामी नशीब उघडण्यास आले. ते पुढे कुलकर्णीपण करू लागले. म्हणून त्यांचे आडनांव कुलकर्णी झाले. घोसरवाडग्रामी मिळालेल्या शेतीवर गुजराणा करीत हे कुटूंब दंडवत घालत आलेल्यावर कृपादृष्टी केली आहे. गोविंदपंत घोसरवाडकर यांचे पंजोबा बाबूराव खंडोबा कुलकर्णी हे महान दत्तभक्त होते. ते वाडीस दर पोर्णिमेला जात असत. त्यांना संतती नव्हती. ते त्यावेळी मनी एक नवस बोलले आणि घोसरवाडहून नृसिंहवाडीपर्यंत दंडवत घालत ते गेले. त्यावेळी नरसोबा वाडीस यति नारायण स्वामी होते. त्यांनी बाबूराव यांना आशिर्वादाचा नारळ घातला आणि पुढे वर्षभरात त्यांना पुत्ररत्न झाले. त्याचे नांव त्यांनी खंडोपंत असे ठेवले. या खंडोपंताना पुढे तीन मुले झाली. दत्तोपंत, चिमाजीपंत व राघोपंत, पुढे चिमाजीपंत यांना गोविंदपंत, बाळाजीपंत व श्री श्रीपादपंत अशी तीन मुले झाली आक्कुबाई व गंगुबाई अशा दोन मुली झाल्या. गोविंदपंतांच्यापासून हालसिध्दनाथांचा या घराण्याचा संबंध आला. गोविंदपंत दादा यांचा जन्म श्री शके 1789 मध्ये कार्तिक शु ।। 11 शुकवार रोजी झाला.

बालभक्त गोविंद :
लहानपणीपासून दादांची भक्ती मार्गाकडे ओढ. विजापूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यात एक सिध्दापूर हट्टी नावाचे लहान खेडे. तेथे रेवणनाथांचे स्थान आहे. त्या देवळाचे, ते जिथे प्रकट झाले तेथील पादूकांचे फोटो या स्मरणीकेत दिलेले आहेतच. या सिध्दपूरहट्टीहून दर, बारा वर्षांनी पालखी घोसरवाडला यायची. ह्या सिध्दपूरहट्टीस कारिकोळ असेही नाव आहे. सिध्दापूर हट्टीस 'कारी च्या झाडाखाली ते प्रकट झाले आहेत. म्हणून 'कारीकोळ' असे नांव पडले आहे. पुढे प्रसिध्द झालेले श्री क्षेत्र आप्पाचेवाडीस येऊन ते कारीच्या झाडाखाली बसून तपश्चर्या करीत असत याचा उल्लेख आढळतो. तेव्हा कारीचे झाड देवाला आधिक प्रिय असावे असे दिसते. पूर्वी बारा वर्षांनी एकदा कारीकोळहून पालखी आली असता दादांना (गोविंदपंत) त्यापालखीचे थोडे विशेष आकर्षण वाटले. सकाळ संध्याकाळा पूजा आरतीचे वेळी दादा पालखीच्या हवज जाऊन बसत. मुक्कमा संपल्यावर पालखी कारिकोळला परत जाणेस निघाली तेव्हा दादांना अतीव दुःख झाले. 'देवा! तु आता मला कसा भेटणार?' असे म्हणत ते रडू लागले. त्यावेळी नाथांनी त्यांना दृष्टांत देऊन सांगितले की 'मी तुझ्या गावाच्या देवळात आहे. रोज माझ्या दर्शनासाठी येत जा.' त्यावेळेपासून दादा न चुकता वाड्यातील देवळात दर्शनासाठी जाऊ लागले आणि यावेळी त्यांना श्रीनाथांचा संचार सुरू झाला. दादांचे वय अंदाजे 10 वर्षे असेल नसेल.
घोसरवाडकर घराण्यात प्रथमपासून दत्त भक्ती चालत होती. दादांचे वडील चिमाजीपंत दररोज गुरुचरित्राचे वाचन करीत असत. हालसिध्दनाथांचे बव्हशी भक्त हे धनगर जातीचे असलेने त्यांना 'धनगररांचा देव' म्हणत. चिमाजीपंतांनी त्यामुळे दादांना देवाला जाऊ नये. त्याची भक्ती करू नये असे मनोमन वाटे. आपण ब्राम्हण मंडळी खालच्या लोकांत मिसळणे योग्य नाही असा त्यांचा भावार्थ पण दादा स्वयंसिध्दनाथच होते. हे त्यांना त्यावेळी कसे कळावे. सध्याचे चिमड सांप्रदायाचे अध्वर्यु असलेले ब्रम्हविद्वरिष्ठ रामराय केळकर महाराज गोविंदपंतांना दहावे नाथच मानत. यावरून त्यांची योग्यता आपणांस कळून येईल. प. पू. रामराय केळकर महाराज सांगतात 'मी गुरूदेव रानडे यांच्या तोंडी दादांचे (गोविंदपंतांचे) नांव एक सिध्द पुरूष म्हणून ऐकले आहे
दांदाना संचार झाला म्हणजे त्यांनी देवळात जाऊ नये म्हणून त्यांना वडील कोंडून घालीत पण खोलीत बसल्या बसल्या त्यांना संचार होऊन ते दाराला धडका देऊन टक्कर देत व कडी निघून पडे आणि ते हत्यारांचा खेळ खेळायला जात. दादांच्या चरित्रांत असे भरपूर चमत्कार घडले आहेत. की ज्यामुळे त्यांच्या मातापित्यांची या देवावर श्रध्दा बसली. वानगी दाखल एकक दोनच पाहू.

निखारे उतरविले
एकदा दादांचे वडील चिमाजीपंत गुरूचरित्राची पोथी वाचीत असता. त्यांच्या पायातून मांडीतून असह्य कळा येऊ लागल्या आणि ते ओरडू लागले. त्यावेळी हा दहा वर्षाचा मुलगा गोविंद हसत हसत नाचत पुढे आला आणि आपल्या आईवडिलांना उद्देशून म्हणाला 'मला नावे ठेवतोस काय?' अरे ही कळ कोणची आहे. माहित आहे? माझी आहे. आत्ताच्या आता थांबवू काय सांग? वेदनाविव्हळ झालेले चिमाजीपंत म्हणाले, 'महाराज, ताबडतोब थांबवा, मी आपणांस शरण आहे' त्यावर दादांनी समोर असलेल्या चुलीतून निखारे घेतल व त्याच्या मांडीवरून फिरविले (उतरविले) आणि विचारले 'बघ थांबली की नाही कळ? 'थांबली' म्हणून मानेनेच शब्दाविन चिमाजीपंतांनी सांगितले त्यावर 'आपला हात पुढे पसरत म्हणाले 'बघ तुझ्या पोराचा हात कुठे भाजला आहे का? अरे मी रेवणनाथ आहे. धनगराचा देव नव्हे' अशाच काही गोष्टी घडल्यावर चिमाजीपंतांचा हालसिध्दनाथावर विश्वास बसला आणि त्यांचा विरोध मावळला.

नणदीचा देवः
सावित्रीबाईंच्या नंतर सहाव्या पिढीतील परशुरामापंत यांच्या पत्नीचे नाव गंगाबाई असे होते. त्यांना दोन मुलीच होत्या. थोरल्या मुलीचे नाव चंद्राक्का असे होते. त्यांना 'नणदी येथील देसाई घराण्यात दिले होते. चंद्रक्कांना पहिल्या वेळी पुत्ररत्न झाले. त्यांचे नाव बाळासाहेब ठेवले. एके दिवशी त्यांची तब्बेत बिघडली वैद्यांनी पण अशा सोडली. गंगूबाईचा चिमाजीपंतांच्या गोविंदावर विश्वास. त्यांनी त्यांचेकडून भंडारा मागून घेतला. व तो लावल्यावर बाळासाहेबांना बरे वाटले. 'नणदी' कर ही पुढे देवाचे भक्त बनले. हालसिध्दनाथाचं तेथेही सध्या देऊळ आहे. भक्तमंडळी आहेत.

तुझे काम होतय जा :
दादा वडिलांचे पश्चात घोसरवाडकरांचेकडे काम करू लागले. या गंगाबाईंना पुत्रसंतान नव्हते. म्हणून त्यांनी एका मुलास दत्तक घेतले होते. त्यावेळी सर्व इस्टेट कोर्ट ऑफ वार्डसच्या ताब्यात होती व मुंबई हायकोर्टात काम चाललेले होते. या कामाचे संदर्भात एका अधिकाऱ्यास भेटणेसाठी दादा कोल्हापूरात आले. त्यावेळी कोल्हापूरात त्यांची कुंभार स्वामींची भेट झाली. कुंभारस्वामीनी अतिशय प्रेमाने त्यांना जवळ बोलावून घेतले व 'तुझे काम होतय जा' म्हणून सांगितले. त्याप्रमाणे पुढे कोर्ट ऑफ वार्डसच्या ताब्यात असलेल्या इस्टेटीची व्यवस्था पाहण्याकरीता श्री गोळिवडेकर, कुंभोजकर (दत्तोपंत) यांचे मंडळ नेमले होते. त्यातील दत्तोपंत कुंभोजकर हे चिमड सांप्रदायातील एक साक्षेपी नामधारक होते. ते नेमाने साधना करायचे. दादांना संचारात आज्ञा झाली की, 'अरे! दत्तोपंत कुंभोजकरांच्या बरोबर चिमडास जाऊन गुरूपदेश घे कारण गुरूपदेशाशिवाय पुर्णता नाही. गुरूपदेशाशिवाय देवाबरोबर प्रत्यक्ष बोलणाऱ्या नामदेवांचे गोरोबांनी 'कच्चे मडके' ठरविले होते. त्यावेळी चिमडला श्री नारायण महाराज यरगट्टीकर हे पाठाधीश होते. ते रामचंद्र महाराजांचे पुत्र अधिकारी पुरूष होते. तुकाराम महाराजांचे अवतार असलेले श्री गुरूलिंग जंगम महाराज हे निंबरगीला होते. त्यांचे शिष्य रघुनाथप्रिय साधू महाराज त्यांचे दोन शिष्य 1) भाऊसाहेब उमदीकर 2) रामचंद्र महाराज, यरगट्टीकर त्यांनी अनेक साधकांना मार्गदर्शन केले व कैवल्याचा मार्ग दाखविला, असे हे चिमड क्षेत्र.
चिमड हे गाव जमखंडी तालुक्यात महालिंगपूर जवळ आहे. या सांप्रदायाचे मूळपीठ कणेरीमठातील काडसिध्देश्वर आणि काडसिध्देश्वर व रेवणनाथ अगर हालसिध्दनाथ हे एकच. हया काडसिध्देश्वरांचे शिष्य गुरूलिंगजंगम महाराज व त्यांचे रामचंद्र महाराज शिष्य होत. रामचंद्र यरगट्टीकर महाराजांचे अधिकारी शिष्य सांगलीचे संत कोटणीस महाराज हे होते. या रामचंद्र महाराजांचे चिंरजीव नारायण महाराज. म्हणजे हा संप्रदाय पर्यायाने रेवणनाथांचाच ! म्हणून नाथांचा दादांना आदेश झाला. तिकडे नारायण महाराजांना पण आदेश झाला की घोसरवाडच्या गोविंदपंत कुलकर्णाना गुरूपदेश दे म्हणून. एकमेकांना खूण पटली आणि पूर्वनियोजित उपदेश झाला. यावेळी एक विशेष घटना घडली. दादांना नाथांचा संचार आहे ही हकीकत चिमडच्या साधकांना समजली होती. प. पू. नारायण महाराजांना मुलगा नव्हता. त्यांच्या साधकांनी दादांनी ही गोष्ट विचारली आणि दादांना संचार झाला आणि त्यांनी आपले गुरू नारायण महाराजांच्या पत्नींच्या ओटीत नारळ घातला. वर्षभरात त्यांना संतती झाली. अशी अपूर्व घटना घडली. गुरूकडून उपदेश घेतलेल्या शिष्याच्या व्दारा नाथांनी गुरूची मनोकामना पुरी करावी हे केवळ अपूर्व आहे.

घोसरवाड येथे चांदीची त्रिमुर्ती :
संगलीचे प्रसिध्द वकील गणेश कोंडो गोडबोले यांच्या (साडूभावास) मुलगा नव्हता. गोडबोले यांच्या सासूबाई एकदा जेवणावेळी आल्या. दादांना संचार झाल्यावर 'माझ्या मुलाला मुलगा केव्हा होईल?' असा त्यांनी प्रश्न विचारला, संचारात आशिवार्दाचार नारळ दादांनी त्यांना दिला. तेव्हा नातू झाल्यावर घोसरवाड येथे येऊन पालखीसमोर त्याला आडवा घालीन असे त्यांनी मागून घेतले होते.
आशिर्वादाप्रमाणे पुढे वर्षभरात नातू झाला. परंतू घोसरवाड येथे येऊन पालखीसमोर मुलाला घालण्याचा नवस त्या विसरल्या. अशी आठ दहा वर्षे गेल्यानंतर तो मुलगा वेड्यासारखा वागू लागला. औषधोपचार व इतर उपाय केले पण त्याचे विचित्र वागणे कमी होईना. तेव्हा त्या स्त्रीस दृष्टांत देऊन महाराजांनी नवस फेडण्याची आठवण करून दिली. लगेच ती नातवाला घेऊन घोसरवाडीला आली. चांदीचे ताट, दोन वाट्या अर्पण करून नवस फेडला. त्या श्री दादांनी भर घालून हालसिध्दनाथाचा चांदीचा एकमुखवटा तयार करून घेतला. तीच मुर्ती देवळात ठेवली आहे. नाथांच्या चरणी ही निवेदनासेवा अर्पण करून हे शब्दांकन पुर्ण करते.
   
 

How to reach Ghosarwad ?

Ghosarwad Google Location : Click Here
Sangali / Kolhapur -> Narsinghwadi -> Herwad -> Panchrasta -> Ghosarwad.
Ghosarwad is a Village in Shirol Taluka , Kolhapur District , Maharashtra State . Ghosarwad is 14.4 km far from its Taluk Main Town Shirol . Ghosarwad is located 34.6 km distance from its District Main City Kolhapur. .
Ghosarwad Pin Code is 416107 and Post office name is Dattawad.


   
Copyright © 2026. All rights reserved.
मुख्य पान | श्री हालसिध्दनाथ | आप्पाचीवाडी / कुर्ली | करीकोल | घोसरवाड | चिमड संप्रदाय | गोविंदपंत दादा घोसरवाडकर | शंकरमामा शिपूरकर | अमावस्या परंपरा | भक्त अनुभव | चित्रसफर (फोटो गॅलरी) | संपर्क