श्री सिध्देश्वर उर्फ हालसिध्दनाथ
घोसरवाड या गावचे दैवत श्री सिध्देश्वर उर्फ श्री. सिदोबा उर्फ श्री. हालसिध्दनाथ, हे नवनारायणातील चमस नारायणाचे अवतार कलीयुगामध्ये धर्मरक्षणासाठी अवतार धारण केला पाहिजे असा विचार करून भगवंतांनी उध्दवाकडून नवनारायणंना निरोप पाठवून व्दारकेस बोलावून घेतले. नवनारायणांची षोडशोपचारी पूजा करून भगवंतांनी आपली मनोकामना त्यांना सांगितली आणि त्याप्रमाणे असे ठरले की, कवी नारायणांनी मच्छिंद्राचा, हरी नारायणांनी गोरक्षनाथांचा, अंतरीक्ष नारायणांनी जालिंदरनाथाचा, प्रबुध्द नारायणांनी गोरक्षनाथांचा, पिप्पीलायन नारायणांनी चर्पटीनाथांचा, अविरहोत्र नारायणांनी नागनाथांचा, दुमिल नारायणांनी भर्तरी नाथांचा, चमसनारायणांनी रेवणनाथांचा, करभाजन नारायणांनी गहिनीनाथांचा अवतार घेऊन धर्मरक्षण, धर्मजागृती करावी.
साधारणपणे 10 व्या शतकाच्या सुमारास मतमतांचा गलबत्ता झाला होता. अनेक पंथ आणि सांप्रदाय यांचे प्राबल्य वाढल्यामुळे आचार-विचारांचा संकर झाला होता, तंत्रमंत्रादि गोष्टी व बाह्य आचार-विचार यांना प्राधान्य मिळून खरा धर्म सामान्यांना पारखा झाला होता. परस्परांच्या सांप्रदायांनी एकमेकांवर आघात करून सामाजिक जीवन बिघडवून टाकले होते. कर्मकांडाच्या गर्तेत सामान्य माणूस रूतला होता व किम्कर्तव्यमूढ झाला होता. अशावेळी श्री नाथसांप्रदायांनी समन्वयाची दृष्टी ठेवून आत्मानुभूतीला प्राधान्य दिले त्यामुळे श्री नाथसांप्रदाय लोकप्रिय झाला.
हे सर्व नाथ अयोनिसंभव आहेत. ज्यावेळी धर्मसंहार होतो त्यावेळी विविध अवतार घेऊन धर्मग्लानी दूर करत असतात. श्री रेवणनाथांचा अवतार त्यापैकी एक आहे. श्री नवनाथ भक्तिसार ग्रथांमध्ये 34, 35 व 36 अध्यायांमध्ये श्री रेवणनाथांचा अवतार कार्याची हकिकत आली आहे.
हालसिध्दनाथांचा अवतार
दोन अडीचशे वर्षापूर्वी रेवणनाथांनी नवीन अवतार घेतला. रेवणनाथांना गाईचे दूध अत्यंत प्रिय आहे. कानडीत दूधाला हाल असे म्हणतात. दूग्ध प्राशनाने प्रसन्न झाले म्हणून हालसिध्दनाथ या नावाने ते प्रसिध्द झाले. अलम्प्रभू व हालसिध्दनाथ यांचे बरेचसे कार्य कर्नाटक प्रांतात झाले आहे. हिंदू, जैन, लिंगायत, मुसलमान अशा समाजातील, सर्व जातीच्या व थरांच्या लोकांना एकत्रित आणण्याचे महान कार्य त्यांनी केले. अद्यापही कर्नाटकात सर्व जातीचे हजारो भक्त त्यांची उपासना करत असल्याचे आपणास पहावयास मिळते.
साधारणपणे इ. स. 1682 ते 1776 हा त्यांच्या अवताराचा काल असावा. 1776 च्या सुमारास ते घोसरवाड ग्रामी आले असावेत. दूधगंगेकाठी ते काहीकाळ थांबले. तिथे इनामदारांचे एक कुरण होते. गावातील मुले तेथे गुरे चरण्यासाठी म्हणून जात असत. तेव्हा हे गोसावी वेषात असलेले महाराज मुलांना बोलावून "तुला काय पाहिजे" म्हणून विचारीत आणि त्या मुलाच्या इच्छेप्रमाणे त्याला जो पदार्थ पाहिजे असेल तो ते देत असत. त्यामुळे मुले आनंदित होत. मुलांना चटक लागल्याने ती न कुरकुरता पहाटेपासून गुरे चरायला आणू लागली. हा हा म्हणता ही बातमी गावात पसरली. लोकांचा लोंढा त्यांच्या दर्शनासाठी आला. घोसरवाड येथे शिंदे-देसाई इनामनदार नावाचे सरदार राहत असत. मूळ संस्थापकांपासून पाचव्या पिढीतील भिकाजी देसाई यांची पत्नी सौ. सावित्रीबाई ही अत्यंत सत्शील, सात्विक व देवावर अतिशय श्रध्दा असणारी बाई होती. त्यांना ही बातमी कळताच त्या स्वतः आपल्या सेवकांसह महाराजांच्या दर्शनास गेल्या. महाराजांचे दर्शन झाल्याबरोबर त्यांना जाणवले की, हा कोणीतरी एक सिध्द पुरुष आहे. आपल्या भाग्यवशात आपल्याला त्यांचे दर्शन घडले आहे. त्यांनी महाराजांना आपल्या वाड्यावर येण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन श्री महाराज वाड्यावर येण्यास तयार झाले. वाड्यावर सदरेजवळ एक खोली होती. तिथे महाराजांच्या राहण्याची व्यवस्थ केली. या साध्वी बाईंनी महाराजांची सेवा आरंभिली. या शिंदे देसाई इनामदारांचे कुलदैवत शंभू होते. या शंभूची एकनिष्ठतेने व भक्तिभावाने त्या पूजा करीत असत. गृहस्थाश्रमातील सर्व सुखे त्यांच्या पायाशी लोळण घेत पण "कल्पतरूला फूल नसे कां वसंत सरला तरी ?" अशी त्या बाईंची स्थिती होती. त्यांना अपत्य नव्हते. एकाग्र मनाने एक दिवस पूजा करताना त्यांना वाटले की, आपल्याला एक छोटेसे बाळ असते तर किती बरे झाले असते. असे म्हणताचएक गोंडस मूल त्यांच्याकडे रांगत रांगत आले, ते पाहताच मातृभावाने उचंबळून जाऊन त्यांनी त्या मुलाला हृदयाशी धरले. आणि काय आश्चर्य, त्यांना पान्हा फुटला. त्यांनी मुलाला पाजविले. रेवणनाथ महाराजांच्या सामर्थ्याची आणि दैवी शक्तीची खात्री त्यांच्यापुरती त्यांना पटली. हा कार्यक्रम काही दिवस चालला असताना भिकाजीरावांच्या अवती-भवती असलेल्या मित्रमंडळींच्या मनामध्ये संशयाचे भूत प्रगट झाले. त्यांनी मंथरेसारखे भिकाजीरावांच्या कानामध्ये वीष भरले. ते म्हणाले, "अरे हा सत्पुरूष वगैरे कोणी नाही, हा बंगाली जादूगार असावा. त्यांनी तुझ्या पत्नीस वशीकरण केले आहे. एक दिवस हा गोसावी तुझ्या पत्नीस पळवून नेईल. सावध रहा।" भिकाजीरावांचे मन बिथरले आणि त्यांनी महाराजांना ठार मारण्याचे ठरविले. एके दिवशी सती सावित्रीबाईंचे जवळ महाराज बालरूपाने बसले असता शिपायांनी त्या खोलीला गराडा घातला. हेतू हा की, मुलाला पकडून ठार मारायचे अशावेळी ते मूल एकदम बंद खोलीच्या बाहेर शिपायांना दिसू लागले. तिथे त्या मुलास शिपाई पकडायला गेले असताना एकदम उंच असलेल्या बुरुजावर दिसू लागले तेंव्हा सारे शिपाई त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावू लागले. त्यावेळी महाराजांनी आपले खरे स्वरूप प्रगट करून ते गावाचे बाहेर पडले. तेव्हा भिकाजीरावांनी त्यांच्यामागे घोडेस्वार सोडले. महाराज पुढे पुढे जात होते व घोडेस्वार जीवांच्या आंकाताने पाठलाग करत होते असे करताना काही डोळेस्वारांचे डोळे गेले, काही घोडी वाटेत मेली व उरलेल्यांना मात्र चिकोडी तालुकयातील आप्पाचीवाडी नामक गावाजवळ असलेल्या फडांच्या वनात ते गुप्त झाल्याचे दिसले.
ही हकीकत सावित्रीबाईंना कळताच त्यांना अतिशय दुःख झाले. श्री महाराजांचे परत दर्शन झाल्याशिवाय तोंडात पाणीही घ्यायचे नाही असा त्यांनी निश्चय केला आणि उपोषणाला प्रारंभ केला. सात दिवस झाल्यानंतर श्री महाराजांनी सावित्रीबाईंचा कळवळा आणि तळमळ बघून ते तिच्यासमोर प्रगट झाले. भिकाजीरावांनाही पश्चाताप झाला. यावेळी महाराजांनी आता वाड्यात येण्यास नकार दिला व तिथे असलेल्या एका लिंबाच्या झाडाखाली ते बसले. तिथे सध्या ते मंदिर आहे. पुढे तिथे गुप्त होऊन आप्पाच्या वाडीस आले.
|